Sunday 17 December 2023

मैत्रीचे पत्र - १

 प्रिय,

      गंगाधर.. गंगा... गंग्या... पाटील... 

पाटील, तुम्हाला महिती आहे का ... मी दिवाळीपेक्षा आपल्या  गावच्या जत्रेची जास्त आतुरतेने वाट पाहत असतो.  ते पहिल्या दिवशीच जागरण-गोंधळ , ती खंडेरायाची पालखी , त्या गावाबाहेरच्या कुस्त्या आणि आपली यारी-दोस्ती... हे सर्व माझ्या आवडीचे अमूल्य क्षण एकदाच जुळवून आणणार सण म्हणजे आपल्या गावची जत्रा... दत्त जयंतीचा कालावधी... माझ्या आयुष्यात; जेंव्हापासून मला समजायला लागल तेंव्हापासून आतापर्यंत फक्त एकदाच आपल्या गावच्या जत्रेला येऊ शकलो नाही. पण; पाटील... यानंतर मी  नेहमी हजर राहील बरका... आपल्या जत्रेमध्ये. 

जागरणाच्या रात्री, चहा पुरवण्याच काम आमच्याकडे तर पालखी ओढण्याचा विशेष मान तुमच्याकडे; कुस्त्याच्या दिवशी तुमचा जंगी सामना इतर प्रतिस्पर्धकांसोबत तर तुम्ही कुस्ती जिंकावी म्हणून माझी धाकधूक माझ्या मनासोबत; असो. कुस्त्या पाहायला मलादेखील आवडतात पण तासाभरापेक्षा जास्तवेळ मी मैदानावर नाही थांबू शकत, कारण त्याच कालावधीत मला नेमून दिलेल्या इतर कामांमुळे... पण मैदानावर त्या कालावधीत काय घडतंय याची खबर मला असते बरका. 

आकाशी पाळणे, मंदिरासमोरची खेळभांड्याची अन प्रसादाची दुकाने, सुशोभित मंदिरे, गावातील जुनी दुकाने नवीन रूपात रूपांतरित, बेकायदेशीर झेंडी, तितली हे कायदेशीर जागेत एकदम इमानदारीने चालणारे अस्थायी खेळ; गावात जत्रेसाठी येणाऱ्या नवीन भाविकांची गर्दी, यांमुळे संपूर्ण गाव एकदम खुलून येत. 



पाटील, आपण गावाबाहेर कुठेही काहीही कारणांमुळे कितीही वेळ राहिलो ना , तरीही गावात जो आनंद, सुख, समाधान, शांती मिळते ना ती गावाबाहेर कुठेच नाही... आपण गावामध्ये कोणत्याही गल्लीत कधीही जाउद्या... त्या गल्लीतील, त्या वाड्यातील सर्व माणसे आपलीच वाटतात... कारण / आणि तीही तितकीच चांगली वर्तणूक (वागणूक) आपल्या सोबत करतात... गावात फिरताना नेहमी आपलेपनाची भावना कायम मनात राहते... पण गावाबाहेर आल्यानंतर परकेपणाची भावना आपोआप मनात जागा निर्माण करते, पण... जेंव्हा कोणीतरी आपलस वाटणार गावाबाहेर भेटत ना... तेंव्हा होणार आनंद गगनात मावेनासाच... आणि हं... पाटील... अशी माणसे गावाबाहेरही भेटतात बरका..!! जग खूप सुंदर आहे... पाटील... आता बघा ना... तुमची आणि माझी मैत्री गावातल्या पेक्षा गावाबाहेरच खूप प्रसिद्ध आहे. आपली ओळख जितकी गावामध्ये होती... त्यापेक्षा अधिक गावाबाहेर असतानाच झाली, नाही का..? आपली भेट जितकी गावात असताना होते त्यापेक्षा कैकपटीने अधिक बाहेरगावी असतानाच.

पाटील; एक गोष्ट सांगू... गावाबाहेर असताना अशीच आपलेपणाची भावना निर्माण करणारा अजून एक मित्र मला मिळाला... माझा अजून एक मित्र बनला... तोही एकदम तुमच्यासारखाच आहे... मी तुमच्याकडून मस्ती करायला शिकलो तर त्याच्याकडून जिवंतपणे जीवन जगायला शिकलो. अशी मैत्री करून ती टिकवण्यासाठी हे आयुष्य खूप छोटस आहे. यानंतरच पत्र मी त्यालाच लिहिणार आहे. असो. विषय खूप भरकटतोय..!!

पाटील, दिनांक २४ ते २८ डिसेंबर आपल्या गावची जत्रा आहे, त्याची आठवण करून देण्यासाठीच हे पत्र.  आणि यावेळेसची आपल्या जत्रेची विशेषतः म्हणजे - श्री संत बाळूमामा यांची मूर्ती स्थापना आणि मंदिर कलशारोहनाचा कार्यक्रम दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे. एक नवीन दैविरुप संत नेहमीसाठी आपल्या गावात स्थानापन्न होणार आहेत. यावेळेस गावात आनंदच आनंद असणार. त्यामुळे मी पण येणार आहे तुम्ही पण या आणि वाचक मित्रहो तुम्ही पण यायच बरका... 


मग, 

         माझ्या गावच्या जत्रेला यायच,

         खंडेरायाच्या पालखीच दर्शन घ्यायच,

         संत बाळूमामाचा आशीर्वाद घ्यायचा,

         दत्त मंदिरात जेवण करायच,

         जंगी कुस्त्या पहायच्या,

        आणि जत्रेचा आनंद घ्यायचा बरका.       




सर्व मैत्रीचे पत्र 

धडपड

 

   

No comments: